नमस्कार शेतकरी बांधवांनो.
आपण पीक वाढीसाठी नेहमीच जास्त प्राधान्य हे एनपीके या खतावर देत असतो. परंतु आपल्याकडून मॅग्नेशियम सल्फेट या खताकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. तसेच दिले तरी आपण ते अनेकदा चुकीच्या पद्धतीने देतो, कारण ते देण्याची पद्धत आपल्याला माहिती नसते.
अनेकदा आपण चुकीच्या पद्धतीने हे खत दिल्यामुळे इतर खतेही नीट लागू होत नाहीत. त्यामुळे या लेखाच्या माध्यमातून मॅग्नेशियम सल्फेट खत: पिकांसाठी महत्त्व, फायदे, योग्य मात्रा आणि वापरण्याची पद्धत पाहणार आहोत.

मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे काय?
मॅग्नेशियम सल्फेट हे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य असलेले खत आहे. या खतामध्ये मॅग्नेशियम (Mg) आणि सल्फर (S) हे दोन महत्त्वाचे घटक असतात.
मॅग्नेशियम हा घटक पानांमध्ये असणाऱ्या क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. क्लोरोफिलमुळे पानांना हिरवा रंग येतो आणि पिके सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करू शकतात.
सल्फर हा घटक पिकांमध्ये प्रथिने तयार होण्यासाठी, वाढीसाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केल्यास पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते.
आजकाल जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक पिकांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता दिसून येते. अशा वेळी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
मॅग्नेशियम सल्फेटचे रासायनिक स्वरूप
मॅग्नेशियम सल्फेटचे रासायनिक सूत्र MgSO₄ असे आहे.
या खतामध्ये सामान्यतः खालील घटक असतात:
मॅग्नेशियम – सुमारे 9 ते 10 टक्के
सल्फर – सुमारे 12 ते 13 टक्के
हे खत पांढऱ्या स्फटिकाच्या स्वरूपात असते आणि पाण्यात सहज विरघळते. त्यामुळे ते फवारणीसाठी आणि ठिबक सिंचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
पिकासाठी मॅग्नेशियमची गरज का आहे?
आता आपण पाहणार आहोत की पिकामध्ये मॅग्नेशियमची नेमकी गरज काय आहे.
1. क्लोरोफिल निर्मिती
पानांमध्ये असलेल्या क्लोरोफिलच्या निर्मितीत मॅग्नेशियमचा मुख्य सहभाग असतो. त्यामुळे पानांचा हिरवा रंग टिकून राहतो. यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगली होते आणि उत्पादन वाढते.
2. प्रकाशसंश्लेषण
पिके सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करतात. या प्रक्रियेसाठी मॅग्नेशियम आवश्यक असते. जेवढी पाने हिरवी असतात तेवढी जास्त प्रकाशसंश्लेषण क्रिया होते.
3. एन्झाइम सक्रिय करणे
मॅग्नेशियम अनेक एन्झाइम सक्रिय करण्याचे काम करते. त्यामुळे पिकांच्या वाढीशी संबंधित अनेक प्रक्रिया व्यवस्थित चालतात.
4. ऊर्जा निर्मिती
मॅग्नेशियममुळे पिकांमध्ये ऊर्जा तयार होण्याची प्रक्रिया सुधारते. मॅग्नेशियम सल्फेट वरील चार महत्त्वाच्या भूमिका योग्य पद्धतीने पार पाडते.
मॅग्नेशियमची कमतरता ओळखण्याची लक्षणे

अनेकदा आपल्याला वाटते की झाडांची पाने पिवळी पडत आहेत, परंतु ती का पिवळी पडत आहेत हे कळत नाही. कधी वाटते नायट्रोजनची कमतरता असेल, कधी वाटते पाण्याची कमतरता असेल, तर कधी वेगळीच कारणे वाटतात.
मॅग्नेशियमची कमतरता असल्यास जुनी पाने पिवळी पडतात आणि त्यांच्या शिरा हिरव्या राहतात. पिकांची वाढ मंदावते आणि उत्पादनात घट होते. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे फळधारणा कमी होते, परिणामी उत्पादन घटते.
मॅग्नेशियम सल्फेटचे पिकांवरील फायदे
मॅग्नेशियम सल्फेटमुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया चांगल्या प्रकारे पार पडते. त्यामुळे पिक स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी सक्षम बनते. झाडातील हिरवळ टिकून राहते.
फळे मोठी, चमकदार आणि टवटवीत दिसतात. त्यामुळे बाजारात फळांना चांगली मागणी मिळते आणि अधिक नफा मिळतो. तसेच पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता देखील मिळते.
मॅग्नेशियम सल्फेट वापरण्याची पद्धत
मॅग्नेशियम सल्फेट दोन प्रकारे वापरता येते.
1. फवारणीद्वारे वापर

फवारणीद्वारे दिल्यास पिकांना मॅग्नेशियम लगेच उपलब्ध होते.
मात्रा:
5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी
उदाहरण:
100 लिटर पाण्यासाठी
500 ते 1000 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट
फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. त्यामुळे पाने करपत नाहीत आणि नुकसान होत नाही.
मॅग्नेशियम सल्फेटमध्ये कोणती खते मिक्स करू नयेत?
1. चुनखडी (Lime) किंवा डोलोमाइट
ही खते मातीची pH वाढवतात. त्याच वेळी मॅग्नेशियम सल्फेट दिल्यास रासायनिक प्रतिक्रिया होऊन मॅग्नेशियम पिकांना कमी उपलब्ध होते. त्यामुळे ही दोन्ही खते एकाच वेळी मिसळू नयेत.
2. कॅल्शियम असलेली खते
खालील खतांबरोबर मिक्स करणे टाळावे:
कॅल्शियम नायट्रेट
जिप्सम
इतर कॅल्शियमयुक्त खते
कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम एकमेकांशी स्पर्धा करतात आणि पिकांना योग्य प्रमाणात अन्नद्रव्य मिळत नाही.
3. जास्त अल्कलाइन खते
जास्त क्षारीय खते किंवा माती सुधारकांसोबत मिसळल्यास मॅग्नेशियमचे शोषण कमी होते.
कोणत्या खतांबरोबर मॅग्नेशियम सल्फेट देऊ शकतो?
खालील खतांबरोबर सामान्यतः वापरता येते:
युरिया
डीएपी
एनपीके खते
शेणखत / कंपोस्ट
वर्मी कम्पोस्ट
ही खते मातीमध्ये मिसळून दिल्यास पिकांना संतुलित अन्नद्रव्य मिळतात.
शेतकऱ्यांसाठी मोलाचा सल्ला:
मॅग्नेशियम सल्फेट जमिनीत देताना शेणखत किंवा कंपोस्टमध्ये मिसळून दिल्यास परिणाम अधिक चांगला मिळतो. सेंद्रिय पदार्थामुळे मातीतील अन्नद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात.
मॅग्नेशियम सल्फेट कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे?
मॅग्नेशियम सल्फेट सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. परंतु काही पिकांना त्याची गरज जास्त असते.
ऊस:
उसाचा हिरवा रंग टिकून राहतो. त्यामुळे उसाची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते.
कापूस:
फुलधारणा आणि बोंडधारणा वाढते. अनेकदा कापूस पिकामध्ये लाल्या रोगाची समस्या दिसते. ही समस्या मुख्यतः मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे निर्माण होते.
सोयाबीन:
दाण्यांची भर चांगली होते आणि उत्पादन वाढते.
भाजीपाला:
टोमॅटो, मिरची आणि वांगी या पिकांमध्ये उत्पादन वाढते.
फळबाग:
डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या पिकांसाठी मॅग्नेशियम सल्फेट अत्यंत फायदेशीर आहे.
मॅग्नेशियम सल्फेट कधी द्यावे?
मॅग्नेशियम सल्फेट सुरुवातीच्या अवस्थेत, फुलांच्या अवस्थेत आणि फळांच्या अवस्थेत दिल्यास उत्पादनात चांगली वाढ दिसून येते.
मॅग्नेशियम सल्फेट फवारणी करताना घ्यावयाची काळजी
उन्हात फवारणी करणे टाळा.
कॅल्शियम नायट्रेटसोबत फवारणी करू नका.
कीटकनाशकांसोबत फवारणी करण्यापूर्वी सुसंगतता तपासा.
फवारणी करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरा.
मॅग्नेशियम सल्फेट फवारणी करताना होणाऱ्या चुका
जास्त प्रमाणात वापर करणे टाळा.
अनावश्यक किंवा जास्त फवारणी करू नका.
निष्कर्ष
मॅग्नेशियम सल्फेट हे दुय्यम अन्नद्रव्य असले तरी ते पिकांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे भाजीला मिठाशिवाय चव येत नाही, तसेच मॅग्नेशियम सल्फेट शिवाय उत्पादन पूर्ण क्षमतेने वाढू शकत नाही.
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात मॅग्नेशियम सल्फेट दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होऊ शकते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा.
शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा लेख वाचला त्याबद्दल धन्यवाद. आमच्या पेजवरील इतरही लेख वाचा. त्यांच्या लिंक खाली दिल्या आहेत.
⚠️ या लेखातील माहिती कॉपी करून इतरत्र वापरण्यास मनाई आहे – Sheti Ek Shastra 🌱


खुपच चांगली माहिती मीळाली धन्यवाद
आंबा, नारळ, चिक्कू, पेरू, लिंबू, जांभूळ, वगैरे फलझाडांना कोणती खते, औषधे द्यावीत याबद्दल कृपया माहिती मिळावी ही विनंती.
खूप चांगली माहिती दिली साहेब आपण
असंच मार्गदर्शन चालू ठेवा